Tuesday 16 March 2021

मोगरा

विनवले किती आज पण मोगरा फुललाच नाही
भुलविले कितीतरी पण आज तो भुललाच नाही.
मी न चुरगाळले कधी मोगऱ्या तुला
का मग तू आज बहरलाच नाही

श्वास अधुरा माझा तुझ्या गंधा विना
कसे घडले आज की मी हुंगलाच नाही

ओंजळीत घेऊनि मी कुरवाळले तुला
कौतुक तुझे मोगऱ्या तुज कळलेच नाही

Tuesday 3 October 2017

श्वापद

दचकलो मी का उगा .. मी श्वापद कोणते पाहिले ..
मी कसे सांगू कुणा .. मी प्रतिबींब माझे पाहिले !

पाहतो जो तो दुरोनी .. दाटली गर्दी अशी ..
हिंस्त्र श्वापद हे नवे .. प्रथम म्हणे ते पाहिले !

ल्यायलो मी आज सारी .. वस्त्र जरी का भरजरी ..
नागडा होतो किती मी .. ठाऊक ज्यांनी पाहिले !

आचरण येथे विसंगत .. दिसते किती क्षणोक्षणी ..
बुडविते जीत्यास पाणी .. पण प्रेत तरंगताना पाहिले !

Sunday 1 October 2017

श्वापद

घाबरलो का उगाच मी ,श्वापद कोणते पाहिले?
काय सांगू कुणास,मी स्वतःला आरशात पाहिले             
दाटली नव्हती कधीही गर्दी अशी सभोवती,  
जो तो म्हणे -हिंस्त्र आहे, ज्यांनी मला पाहिले.

ल्यायलो होतो जरी मी वस्त्र सारी भरजरी                  
बोलले ते- हा नागडा,ज्यांनी सत्य माझे पाहिले

ही कुचेष्टा जीवनाची अशी  कितीदा पहिली
जगू म्हणे तो बुडताना,प्रेतास तरंगता पाहिले

किरण काळे 1.10.17

Sunday 22 January 2017

शब्द

शब्द माझे शहाणे माझ्याहूनही आहेत, कळते त्यांना हेही केंव्हा उगे राहणे आहे

हा भोवती कल्लोळ वेड्या भावनांचा, ते सांगती मला तुज मूक साहणे आहे

चालला जगी जो बाजार मतलबाचा, टाळशील किती तू, तुज हेच पाहणे आहे

शब्द शहाणे  रोखतील वाट ,तू कसा थांबशील किरण, तुला चालणे आहे

किरण 10.1.17

Thursday 19 January 2017

विस्तव

चटक्यांची काय भीती? मी विस्तव घेतला हाती              
तू विसर मला, मज विरहातही आहे प्रीती     
तू अशी सामोरी आली की मरणाची न वाटे भीती         
व्यर्थ सांगू कुणा माझ्या वेदना, कोणास काय क्षिती?

किरण
असेच कधीतरी 

Tuesday 10 January 2017

स्वप्न

माळला मोगरा तिने गंधित हा श्वास आहे    

चुरगाळला हातात मी,हातास हि सुवास आहे

वेळ वेडी होती अशी ती अन मीही स्वप्नवेडा ;
घेतला मग तोच हात आता मी उशास आहे

स्वप्न मग झाली सुगंधी, रंगुनीही रात्र गेली;
उषः काली हि तुझाच भोवती आभास आहे

किरण

Tuesday 15 November 2016

पुन्हा प्रवास

काफीला सारा पुन्हा मागे सोडला
एकट्याचा पुन्हा प्रवास चालू झाला 
                      
थांबलो जरासा पाहून सावली ती          
अचानक थोडा परत सूर्य कलला  

भेट थोडकी ती याद ठेऊन गेली
जहरास थोडा उतारा मिळाला

नसे व्यर्थ सारे माझे चालणे ते                  
  काट्यांस पावलांचा आसरा मिळाला

किरण
14.11.16